मसूर : ‘सध्याच्या काळात इथेनॉलला मोठी मागणी असून एक लाख लिटर क्षमतेची डिस्टिलरी मंजूर आहे. पुढील डिसेंबरअखेर इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होईल. कारखान्याचा रखडलेला विस्तार लवकरच पूर्णत्वास जाईल. हक्काचे शासन असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. तेव्हा बहुचर्चित हणबरवाडी धनगरवाडी योजनाही लवकरच पूर्णत्वास जाईल,’ असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
सह्याद्री साखर कारखान्याची वार्षिक सभा कारखान्याच्या गेस्ट हाऊसमधील सेमिनार हॉलमध्ये ऑनलाईन पार पडली, यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष देवराज पाटील, सभापती प्रणव ताटे, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मीताई गायकवाड, अजित पाटील-चिखलीकर, अशोकराव पार्लेकर, तानाजी साळुंखे यावेळी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘साखरेचा दर वाढत नसल्यामुळे सहकार अडचणीत आला आहे. तरीही ‘सह्याद्री’ने संकटांवर मात करीत सभासद शेतकऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. ऊस नोंदणी व तोडणी ते गाळपापर्यंत पारदर्शकता कायम ठेवली आहे. मजूर तुटवड्याच्या अडचणीवर मात करून साडेसात हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सभासदांवर थोडाफार आर्थिक बोजा पडेल, पण विस्तार पूर्णत्वास जाईल.’
ऑनलाईन सभेमध्ये भरत चव्हाण, विश्वास जाधव, आनंदराव थोरात, संपत बोबडे यांसह अन्य सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्री पाटील यांनी उत्तरे दिली.
कार्यकारी संचालक आबासाहेब पवार यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम केले. एच. टी. देसाई, जी. व्ही. पिसाळ यांनी मार्गदर्शन केले. संचालक मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले.
चौकट
ऑनलाईन प्रक्षेपण
सभेत जवळपास २७५ सभासदांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. याशिवाय कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कऱ्हाड, मसूर, उंब्रज, रहिमतपूर, काशिळ, सुपने, चरेगाव, तासवडे, बेलवडे अशा एकूण तेरा मोठ्या गावांमध्ये सभेच्या कामकाजाचे ऑनलाईन प्रक्षेपण करून सभेचे कामकाज पाहण्याची सभासदांना संधी उपलब्ध करून दिलेली होती.
फोटो २६सह्याद्री
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे चेअरमन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मार्गर्शन केले. (छाया : जगन्नाथ कुंभार)