सातारा : कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. हाता-तोंडाचा बसेना मेळ...जगण्याची झाली भेळ असं उरातलं दु:ख घेऊन कष्टानं उभं राहणारे गोरगरीब लोक रस्त्यावर आले. आमची उपासमार थांबवा...अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला घातली.अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ रिक्षा युनियनच्यावतीने रिक्षा, चालक व मालक यांना कोरोना संकट काळात शासनाने तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कोरोना संकटकाळात शासनाने वेळोवेळी केलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
एका बाजूला उपासमारीशी सामना करत असताना दुसऱ्या बाजूला बँका, सोसायट्या, सहकारी बँका तसेच सर्व फायनान्स कंपन्या कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावत आहे. या व्यावसायिकांना कर्ज हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी, तसेच कर्जाचे व्याज माफ करावे, परिवहन विभागातील कर माफ करावा, कोरोनामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर त्याचे सर्व कर्ज माफ करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, शहर अध्यक्ष शशिकांत खरात सहभागी झाले.बँड बेन्झो चालक व कलाकार संघटनेच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोकराव जाधव, जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे, खटावचे उपसभापती आनंदराव भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड-बाजा आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २५0 ते ३00 बँड बेन्जो पथके कार्यरत आहे. प्रत्येक पथकात २0 ते २५ कलाकार काम करतात. प्रत्येक जिल्ह्यात ६ हजार ते ७ हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. शासनाने रोजीरोटीस महाग झालेल्या या व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी करण्यात आली.यात्रेतील खेळणी, पाळणे व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ८00 कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. या कामगारांकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेच साधन नसल्याने खेळणी व पाळणे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासाठी बाळासाहेब सातपुते, सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.व्यावसायिकांची वरात जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातकोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. विवाह सोहळे बंद झालेल्या बँडबाजा व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कलाकारांच्या हाताला आता काम राहिलेले नाही. या व्यवसायांनी बँड-बाजा वाजवतच आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. प्रशासनाने आमच्या पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली.