प्रगती जाधव-पाटीलसातारा : आपल्या घरात जोरकसपणे दिवाळीची तयारी सुरू असताना तोच आनंद समाजातीत अन्य बांधवांनाही मिळावा, या विचाराने बालसंस्कार वर्गातील मुलांनी मुष्ठीफंड योजनेतून सहकार्य केलं. समाजातील दानशूर लोकांनी दिवाळीचं किट भेट दिलं आणि विद्यार्थ्यांनी घरातून मूठ-मूठ धान्य आणून तब्बल दहा कुटुंबांची दिवाळी साजरी करण्यास हातभार लावला.
शाहूपुरी येथील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेच्या शाहूपुरी माध्यमिक विद्यालय व परिसरांतील पाचवी ते सातवीपर्यंतच्या बाल-कुमारांसाठी बालसंस्कार वर्ग चालविले जातात. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात, समाजामधील हरवत चाललेली संवेदनशीलता जागृत व्हावी, यासाठी गेल्या ९ वर्षांपासून सप्टेंबर ते मार्च या दरम्यान दर रविवारी संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. या संस्कार वर्गांमध्ये यशस्वी आयुष्य जगण्याबरोबरच संवदेनशील नागरिक म्हणून या माध्यमातून विद्यालयातील व परिसरातील गरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही संस्कार वर्गातील बालमित्रांनी व काही दानशूर व्यक्तींच्या निरपेक्ष सहकार्यातून दहा गरीब कुटुंबांना दिवाळी पदार्थांसाठीच्या सर्व प्रकारच्या किराणा साहित्य स्वरुपातील वस्तूंसह उटणे, साबण, अत्तर, वातींसह पणत्या, कुंकूम तिलक डबी, सुगंधी तेल आदी वस्तूही गरजूंना देण्यात आल्या.
यावेळी सर्व उपस्थित मुले व पालकांना संस्कार वर्गाच्यावतीने ‘मदत घेणारे हात उद्या तुमच्यामध्ये, शिक्षणामुळे जी ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल तेव्हा समाजातील उपेक्षित घटकांना मदत करणारे अन् देणारे व्हावेत,’ अशा शुभेच्छा देण्यात आल्या. याबरोबरच समाजातील दुर्लक्षित घटकांची वेदना समजून घेणारे संवेदनशील मनं तुमच्यामध्ये तयार व्हावे, अशी अपेक्षा यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
मुष्ठी फंडातून असं उभं राहिलं साहित्य!बालसंस्कार वर्गामध्ये गेल्या नऊ वर्षांपासून मुष्ठी फंड योजना कार्यान्वित आहे. या योजनेनुसार शाळेतील पाचवी ते सातवीचे विद्यार्थी मूठभर धान्य जमा करतात. प्रत्येकाकडून आलेले मूठभर धान्य एकत्रित आल्यावर काही किलोंचा आकडा गाठते. तेल सोडलं तर हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांकडून जमा होते. शाळा परिसरातील दानशूर व्यक्ती तेलासह अभ्यंगस्नानासाठी आवश्यक असणाºया वस्तू देण्यासाठी पुढं येतात.
बालसंस्कार वर्ग उपयुक्तच...लहान वयातच मुलांवर संस्कार केले तर भविष्यात सजग आणि सक्षम पिढी निर्माण होऊ शकते, हे बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. दरवर्षी, सामाजिक भान ठेवून हे विद्यार्थी समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी प्रयत्नपूर्वक यशस्वी मोहीम राबवितात. त्यांचे विचार कृतीत आणण्याचे काम आम्ही करतो. - भारत भोसले, संस्कारवर्ग संचालक, शाहूपुरी