सातारा : दिवाळीत लक्ष्मी पूजनादिवशी लक्ष्मी म्हणूनच केरसुणीचे पूजन केले जाते. त्या दिवशी त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने चार हात दिवसभर काबाडकष्ट करुन दिवसभरात हजारो केरसुण्या तयार करत आहेत. अस्वच्छेतेमुळे आरोग्य बिघडते, लहान मुलं आजारी पडतात. त्यामुळे घरोघरी वापरली जाणारी केरसुणी घरात स्वच्छता ठेवून कुटुंबीयांचे आरोग्य जपण्याचे काम करते. त्यामुळे तिला लक्ष्मी म्हणूनही संबोधले जाते. दिवाळीतील लक्ष्मी पूजनादिवशी या केरसुणीला लक्ष्मी समजून पूजा करण्याची परंपरा आहे. शहरातील सिमेंटच्या जंगलात गुळगुळीत फरशी आली अन् दारातील अंगण नाहीसे झाले. त्यामुळे अनेकांच्या घरात केरसुणी हद्दपार होते की काय अशी भीती व्यक्त होत असली तरी लग्न समारंभ अन् दिवाळीच्या निमित्ताने तिला चांगली मागणी आहे. साताऱ्यात २५ हून अधिक कुटुंबे केरसुणी बनविण्याचे काम करतात. हे कुटुंब पीडिजात पद्धतीने केरसुणी करत असले तरी हा व्यवसाय अडचणीत आला आहे. केरसुणीसाठी लागणाऱ्या शिंदोळीच्या झाडांची पाने मिळत नसल्याने ते शोधण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. दिवाळीसाठी लागणाऱ्या केरसुणी बनविण्यासाठी गौरी-गणपतीपासूनच सुरुवात केली जाते. (प्रतिनिधी) एका फडाला पाच रुपये गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी शिंदोळीची झाडे ओढे, नाले, तलाव, डोंगरी भागात आढळत होती. परंतु, सध्या ही झाडे काही ठराविक ठिकाणीच पाहायला मिळतात. त्यामुळे कारागिरांना एका फडाला पाच रुपये मोजावे लागतात. एका केरसुणीला चार-पाच फड लागत असल्याने ही फड परवडत नसल्याचे कारागीर सांगतात. अशी बनवतात केरसुणी... शिंदोळीचा पाला उन्हात कडक वाळविला जातो. त्यानंतर त्या पाल्याचे काटे झाडून काढण्यात येतात. कडा मोडून बांधणी करण्यात येते. त्यानंतर बांधणीतील पाला विंचरण्यात येतो. शेवटी तंगुसाने तो बांधण्यास सुरुवात केली जाते. एक केरसुणी तयार करण्यासाठी सरासरी अर्धा तास लागतो. त्या तुलनेत मोबदला मात्र फारसा मिळत नाही.
हात चार.. पण केरसुण्या बनताहेत हजार !
By admin | Published: October 15, 2016 11:43 PM