सातारा : हात, पाय मोडून वाहत्या कॅनॉलमध्ये फेकून दिलेला वृद्ध शस्त्रक्रियेविना जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून खितपत पडला आहे.
दत्तात्रय कोंडिबा भंडलकर (वय ६५, रा. पाडेगाव फार्म ता. फलटण) हे गेल्या तीन दिवसांपूर्वी पाडेगाव येथून रात्री नऊ वाजता सायकलवरून घरी निघाले होते. यावेळी पाडेगाव येथील कॅनॉलजवळ चार चोरट्यांनी त्यांना अडवून दांडक्याने बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांच्या खिशातील काही रोकडही चोरट्यांनी लंपास केली होती. त्यानंतर हात,पाय मोडून त्यांना वाहत्या कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आले होते. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरूवातीला त्यांना सलाईन लावण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांच्यावर कोणतीच शस्त्रक्रिया केली गेली नाही. उजवा हात आणि उजवा पाय मोडल्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होत आहेत. रात्रभर ते विव्हळत आहेत. मात्र, तरीही त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाºयांनी शस्त्रक्रिया केली नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
दत्तात्रय भंडलकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे त्यांना दुसºया रुग्णालयात परवडणारही नाही. त्यांच्या हातावर आणि पायावर सिव्हिलमध्येच शस्त्रक्रिया करावी, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.