सातारा : जिल्ह्यातील जी जनता भोजनाच्या माध्यमातून एक वेळची भूक भागवत होती, त्या गोरगरीब जनतेला जेवण मोफत देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आणि बघता बघता दातृत्वाचे असंख्य हात पुढे येऊ लागले. येथील कल्याणी विद्यालयाच्या १९९९ मधील बॅचच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे मदत सुपूर्द केली.
गोरगरीब जनतेला एक वेळेचे मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, याचा लाभ जनता घेत आहे. आता सातारा शहरातील शिवभोजन थाळी व्यावसायिकांनी रात्रीच्या वेळचे जेवणदेखील देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडे मदतीचा ओघ येऊ लागला.
रात्रीच्या वेळच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी शिवभोजन चालकांकडून कोणत्याही अनुदानाची अथवा मोबदल्याची अपेक्षा न करता सेवाभावी वृत्तीने जेवण वाटप करण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुख्यतः सातारा शहरातील विविध प्रभागांतील झोपडपट्टीमधील गरीब व गरजू व्यक्ती पुलाखाली मुक्काम करणारे तसेच एसटी स्टँडवरून काम करणारे बेघर लोक, फिरस्ते कारागीर मजूर यांचा समावेश असेल.
जिल्हा प्रशासनाने शिवभोजन थाळी दोन्ही वेळेस मोफत लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा सन १९९९ च्या विद्यार्थ्यांनी ५०० किलो तांदूळ, ९० किलो मूगडाळ व ९० लिटर सोयाबीन तेल आपला खारीचा वाटा म्हणून आज ३१ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांच्या कार्यालयात माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांना उपलब्ध करून दिले आहे. याकामी शाळेचे माजी विद्यार्थी सागर कारंडे, तानाजी भणगे, सचिन खाडे, विजय कांबळे, अपर्णा लोखंडे, शैलजा शिरसवडे व अन्य मित्र-मैत्रिणींनी विशेष प्रयत्न केले.
यांना खरंच गरज आहे...
मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे सध्या हात बंद आहेत. त्यांना अनेकदा एका वेळेच्या जेवणावरच भागवावे लागते. शासनाने शिवभोजन यानिमित्ताने त्यांच्या एक वेळच्या जेवणाची सोय केली, पण पोटाची भूक ही किमान दोन वेळा तरी माणसाला भागवावी लागते. रात्रीच्या जेवणाची सोय जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेतला. या लोकांना खरंच अन्नाची गरज आहे.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांच्याकडे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत सुपूर्द केली.