नितीन काळेल - सातारा ‘सत्ता’ अशी बाब आहे की, घराघरांत भांडणे लावते. पक्षबदल तर दुरचीच गोष्ट. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीतही अनेकांनी आमदारकीसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या; पण मतदारांनी त्यांचे सर्व मनसुबे धुळीस मिळविले. या निवडणुकीत सर्वात अधिक करून भाजपात जाणाऱ्यांचाच कल अधिक होता. पण, त्यांचे ‘कमळ’ मात्र कोठेही फुलले नाही. दोघा मातब्बरांनी ‘धनुष्यबाण’ हातात घेतला; पण नेम मात्र बसलाच नाही, अशी स्थिती झाली.राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकत्र नांदत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा व महायुतीचा काडीमोड झाल्यानंतर चौरंगी लढत होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आतापर्यंत दुरंगी-तिरंगी लढती होणाऱ्या ठिकाणी चौरंगी तसेच ‘मनसे’मुळे पंचरंगी लढतीचे संकेत स्पष्ट झाले. त्यामुळे अनेकांना आमदारकीचे वेध लागले. काही पक्षांना तर अनेक मतदारसंघात स्ट्राँग उमेदवार मिळत नव्हते. अशा वेळी आयात उमेदवारांवर भर देण्यात आला. पक्षांनीही त्यांना त्यांची पार्श्वभूमी विचारत न घेता उमेदवारी बहाल केली. अशा अनेक आयारामांना राज्यातील जनतेने साफ नाकारले आहे. अशीच स्थिती सातारा जिल्ह्यातही दिसून आली. मात्र, या दलबदलूंनाही साथ मिळाली नाही.जिल्ह्यातील सातारा मतदारसंघातील व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी भाजपात प्रवेश केला. पूर्वी त्यांचा काँग्रेस ते शिवसेना असा प्रवास राहिला आहे. वाई मतदारसंघातील व महाबळेश्वरचे नगरसेवक ज्येष्ठ काँग्रेस नेते डी. एम. बावळेकर यांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. शिवेसेनेचा एकेकाळी जिल्हाप्रमुख भूषविलेले व लोकसभेला बंडखोरी करून उभा राहिलेले पुरुषोत्तम जाधव यांनी ‘नमो-नमो’चा जयघोष धरला. फलटणमध्ये महायुतीत मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला जाईल, या हेतूने दिंगबर आगवणे यांनी धुमधडाक्यात काँग्रेसमधून बाहेर उडी मारली. पण, आघाडी आणि युती तुटल्याने त्यांनी परत गृहप्रवेश केला. फलटणमधीलच व जिल्हा परिषदचे माजी सदस्य पोपटराव काकडे यांनीही हात सोडून ‘स्वाभिमानी’ला जवळ केले. माणमध्ये काँग्रेसच्या शेखर गोरेंनी ‘कपबशी’ हातात घेतली. रणजितसिंह देशमुख यांनीही बदलत्या वातावरणात आपल्या ‘हातात’ धनुष्यबाण घेतला. दुसरीकडे डॉ. अतुल भोसले यांनी पाच वर्षांत दोनवेळा पक्ष बदलला. २००९ रोजी कऱ्हाड उत्तरमधून राष्ट्रवादीकडून पराभव पाहिल्यानंतर ‘हात’ धरला. या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कऱ्हाड दक्षिणमधून हातात ‘कमळ’ घेतले. अशा घडामोडी घडल्या; पण त्यांना यश मात्र मिळालेच नाही. या निवडणुकीत मात्र तिघांना आपापल्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते घेण्यात यश आले आहे. मात्र, त्यांचा पराभव हा मोठ्या मताधिक्याने झाला, हेही विसरता येणार नाही. सातारा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दीपक पवार यांना ४७ हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. फलटणमध्ये दीपक चव्हाण यांच्याकडून आगवणे यांना ३३ हजारांनी मात खावी लागली. माणमध्ये पुन्हा ‘जय हो’चाच नारा झाला. जयकुमार गोरे यांनी आपल्या लहान भावाला सुमारे २३ हजार मतांनी हरविले. रणजितसिंह देशमुख चौथ्या क्रमांकावर राहिले. कऱ्हाड दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले हे पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान देत होते. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. वाईत पुरुषोत्तम जाधव व बावळेकर हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. अटकळच राहिली... लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात कोठेही मोदी लाट दिसली नाही. आताही या निवडणुकीत भाजपची हवा निर्माण होऊन एखादी तरी जागा निवडून येईल, अशी भाजपकडून अटकळ बांधली जात होती; पण ती अटकळच राहिली. शिवसेनेनेही माणमधून रणजितसिंह देशमुख यांच्या हातात ‘धनुष्यबाण’ दिला. पण, तो त्यांना पेललाच नाही. देशमुख फक्त राजकीय हवा करण्यात यशस्वी ठरले.
अनाहूत पाहुण्यांचे हात रिकामेच!
By admin | Published: October 22, 2014 10:11 PM