सागर चव्हाण- पेट्री शहराच्या पश्चिमेकडील यवतेश्वर, कास, बामणोली, तापोळा परिसरात दरवर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने येथील परिसरात खरीप पिके चांगल्या प्रकारे घेतली जातात; परंतु यंदा पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीबाबत शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत होते. गत महिन्यात झालेल्या पावसातून चिंता सरते ना सरते तोच कापणीस आलेल्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस केली जात आहे. यामुळे पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या या परिसरात भात, नाचणी, वरी, हायब्रिड, कारळा, भुईमूग ही पिके कापणीसाठी तयार झाली असून, बहुतांशी ठिकाणी भात कापणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, रानडुक्कर, रानगवे, साळिंदर, लांडोरी, रान कोंबड्या, ससे, यांचा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी तर माकडे, वानरे, पाखरे दिवसभर पिकांची नासधूस करत आहे. या वन्य प्राणी, पक्ष्यांपासून पिके वाचविता यावीत, तसेच त्यांना संरक्षण देऊन होणारे नुकसान टाळावे, यासाठी शेतकरी वर्ग दिवसरात्र पिकांच्या शिवारात नाना प्रकारे क्लृप्त्या आखून राखण करताना दिसत आहेत. कष्टानं पिकवलेल्या पिकाची वन्यप्राण्यांकडून नासधूस होत असल्याने हे नुकसान टाळण्यासाठी बळीराजाची धडपड सुरु आहे.संरक्षणासाठी नानातऱ्हेचे उपायझडपी ठोकडा : रानात मोठी काठी रोवून त्याच्या उंचावरील टोकाला स्टील अथवा पत्र्याचा मोकळा डबा अडकवून त्या खालोखाल सुपासारखी जड वस्तू लटकविली जात आहे. डब्याच्या चोहोबाजूला लाकडी, लोखंडी सळ्या आपटून होणाऱ्या आवाजाने वन्यप्राणी पळून जातात व पिकांचे रक्षण होते.थायमॅट : वासाने वन्य प्राणी येत नाहीत यामुळे थायमॅट पुडीत बांधून ठेवण्यात येते.कंदील : उजेडामुळे प्राणी रानात शिरत नाहीत. त्यामुळे शेतकरी कंदील, बॅटरी रात्रभर रानात सुरू करून ठेवत आहेत.साड्या जुन्या कॅसेटचे रिल, कागदी पट्ट्या, प्लास्टिक कापड, प्लास्टिक बारदाने शिवारात तसेच शिवाराच्या चोहोबाजूला लावण्यात येत आहे. तसेच लाकूड, बांबू, तार यांचे कुंपण चोहोबाजूला लावून वन्य प्राण्यांच्या महत्त्वाच्या वाटा बंद करण्यात येत आहे.शिवारातील पिकांना संरक्षण देण्यासाठी दिवसरात्र राखण करावी लागते आहे. यासाठी रानात ठिकठिकाणी कुपी तयार केल्या आहेत. दुपारच्या कडक उन्हात या कुपीचा आश्रय घेता येतो. शिवारात लावण्यात आलेल्या रंगीत पट्या दिवसा उन्हात चमकतात तसेच त्यांच्या हालचालीमुळे पशु, पाखरापासून पिकांना संरक्षण मिळते.- राजेंद्र उंबरकर, शेतकरी, यवतेश्वर
कष्टानं पिकवलं; हिकमतीनं राखतोय!
By admin | Published: October 25, 2015 9:18 PM