अमृत दिनकर भोसले (रा. कोंजावडे, ता. पाटण) असे शिक्षा सुनालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाचे वकील अॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंजावडेतील अमृत भोसले याच्या नात्यातील मुलीने प्रेमविवाह केला होता. या विवाहास अमृतचा विरोध होता. मात्र, मुलीने विवाह केल्यामुळे अमृत रागात होता. याच रागातून त्याने संबंधित मुलीचा पती व त्यांचा सावत्र भाऊ यांच्यावर गुप्तीने वार केले होते. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. याबाबतचा गुन्हा पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले.
जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाने या खटल्यात सतरा साक्षिदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षिदारांच्या साक्ष ग्रहीत धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवित वेगवेगळ्या दोन कलमांसाठी प्रत्येकी चार वर्ष सक्तमजुरी व तीनशे रुपये दंड तसेच एका कलमाखाली तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीनशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावी लागणार आहे.