महाबळेश्वर : महाबळेश्वरसह वेण्णालेक परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य मंगळवारी सकाळी पाहावयास मिळाले. वेण्णालेक परिसरात सोमवार रात्री ते मंगळवारी पहाटे ४ अंशापर्यंत तापमान खाली आले असल्याची माहिती मिळाली.महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा ४ अंशापर्यंत खाली उतरल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते.महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. मंगळवारी पहाटे वेण्णालेक परिसर धुक्याच्या दुलईत न्हाऊन निघाला होता. या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळाले.येथील प्रसिद्ध वेण्णालेकसह लिंगमळा परिसरामध्ये चारचाकी गाड्यांच्या टपांवर, पानांवर, वेण्णालेकच्या लोखंडी जेटीवर काही प्रमाणात दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्रे पहावयास मिळाले. तर लिंगमळानजीक स्मृतीवन परिसरात तर झाडाझुडपांच्या पानांवर हिमकण जमा झाले होते. या परिसरात थंडीचे प्रमाण वेण्णालेक पेक्षा अधिक जाणवत होते. दरम्यान, या थंडीच्या हंगामातील हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Satara: महाबळेश्वरमध्ये वेण्णालेकवर दवबिंदू गोठले, तापमान किती अंशावर.. जाणून घ्या
By दीपक शिंदे | Updated: December 17, 2024 13:27 IST