मायणी : येथील भारतमाता विद्यालयातील कुस्ती आखाड्यात सोमवारी सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यामध्ये हरियाणाचा रविकुमार गंदामिया विरुद्ध मुंबई महापौर केसरी समाधान पाटील यांची कुस्ती बरोबरीत सोडविली. तर कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध पंजाबचा मुबारक कुमार यांच्या निकाली कुस्तीमध्ये गुणांच्या आधारे मुबारक कुमारने बाजी मारली.
येथे भारतमाता विद्यालयातील कुस्ती आखाड्यात सोमवारी कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद साताऱ्याचे समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र सानप, पंचायत समिती माजी सभापती संदीप माळवे, वडूजचे नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, पंचायत समिती सदस्य हिराचंद पवार, डॉ. विकास देशमुख, माजी सरपंच प्रकाश कणसे यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह क्रीडाप्रेमी व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरियाणाचे रविकुमार गंदामिया विरुद्ध मुंबई महापौर केसरी समाधान पाटील यांची कुस्ती तीस मिनिटे चालू होती. दोघेही डाव-प्रतिडाव करत होते. मात्र, निकाली कुस्ती होत नसल्याने ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध पंजाबचा मुबारक कुमार यांची कुस्ती सुमारे अर्धातास चालली. मात्र, कुस्तीचा निकाल लागेना, त्यामुळे पंचांनी कुस्ती गुणांवर घेण्याचा निर्णय घेतला व गुणांच्या आधारे मुबारक कुमारने बाजी मारली.
महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा व कर्नाटकमधील शेकडो कुस्तीवीर दाखल झाले होते. या ठिकाणी मुलींच्याही चार निकाली कुस्त्या झाल्या. शंभर रुपयांपासून ते एक लाखापर्यंत निकाली कुस्त्या झाल्या. सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्हातील नामवंत पैलवानांबरोबरच नवोदित पैलवानांनी कुस्ती आखाडा फुलून गेला होता.मायणी येथे हरियाणाचा रविकुमार गंदामिया विरुद्ध मुंबई महापौर केसरी समाधान पाटील यांची कुस्ती लावताना सुरेंद्र गुदगे व मान्यवर उपस्थित होते. दुसºया छायाचित्रात कुस्ती शौकिनांनी स्पर्धा बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.