शंकर पोळ
कोपर्डे हवेली : येथील ग्रामपंचायतीची निवडणूक पारंंपरिक दोन गटात होत असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सिध्देश्वर पॅनेल तर विरोधी काॅंग्रेस गटाच्या हनुमान पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत आहे. काही प्रभागात काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.
कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात लोकसंख्या आणि सदस्यांची संख्या जास्त असलेली ग्रामपंचायत म्हणून कोपर्डे हवेलीकडे पाहिले जाते. सत्ताधारी गटाचे नेतृत्व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण व माजी संचालक बळवंतराव चव्हाण हे करीत असून विरोधी गटाचे नेतृत्व कऱ्हाड बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक हिंदुराव चव्हाण तसेच कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण हे करीत आहेत. दहा वर्षांपासून या ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे असल्याने त्यांच्याकडे विकासाचा मुख्य मुद्दा प्रचारात आहे. तर घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन यासह आरोग्य केंद्राचा मुख्य मुद्दा घेऊन विरोधक प्रचारात उतरले आहेत. विरोधक छुप्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. तर सलग सत्तेची हॅटट्रीक करण्यासाठी सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे.
प्रभाग क्रमांक एक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तो उद्ध्वस्त करण्यासाठी विरोधी गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. तर प्रभाग दोन हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून त्याला सुरूंग लावण्याचे प्रयत्न सत्ताधारी गटाकडून सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रभागात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे. संपूर्ण गावाचे लक्ष या दोन्ही प्रभागांतील लढतीकडे लागले आहे. काही प्रभागातील सदस्य फुटून येतील, असा अंदाज आहे. भाजपाचे मतदान अल्प असले तरी ते डावलून चालणार नाही. त्यासाठी दोन्ही गटांकडून ते मतदान आपल्याला कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केला जात आहेत.
काही नाराजांची समजूत काढण्यासाठी दोन्ही गटातील नेते प्रयत्नशील आहेत. बाहेरगावी असलेले मतदार आणून आपणालाच कसे मतदान मिळेल, याविषयी दोन्ही गट प्रयत्नशील आहेत. सध्यातरी मते मिळविण्यासाठी दोन्हीही गटातील उमेदवार छुप्या पध्दतीने प्रचार करीत आहेत.
- चौकट
दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांची चाय पे चर्चा...
सकाळी काही उमेदवार गावाच्या मध्यभागी असलेल्या हॉटेलमध्ये एकत्रित येऊन चहा घेतात. ‘चाय पे चर्चा’ करीत प्रचाराला ते सुरुवात करतात. सत्ताधारी गट आणि विरोधी गट एकमेकांच्या विरोधात असले तरी त्यांचा प्रचार हसत खेळत सुरू असतो. त्यामुळे गावात कसलाही तणाव नाही. प्रचार विभक्त आणि चर्चा एकत्रित असेच चित्र या निवडणुकीत पहायला मिळत आहे.
- चौकट
वर्षनिहाय सत्तेचा सारीपाट
वर्ष : सत्ता : सदस्यसंख्या
२००५ : काँग्रेस : ९ काँग्रेस, ६ राष्ट्रवादी
२०१० : राष्ट्रवादी : ८ राष्ट्रवादी, ७ काँग्रेस
२०१५ : राष्ट्रवादी : ९ राष्ट्रवादी, ६ काँग्रेस