सातारा : सातारा नगरपालिकेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू होती. गुरुवारी सकाळपासून कालिदार पेट्रोलपंप ते पारंगे हॉस्पिटल चौकापर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येत होती. खोक्याबरोबरच पान टपऱ्याही पोलिस बंदोबस्तात काढण्यात आल्या.सातारा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तीन दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी रविवार पेठ भाजी मंडईतील ११ खोकी काढण्यात आली होती. बुधवारी ही मोहीम रेंगाळली होती. कारण, संपूर्ण दिवस विक्रेत्यांना हुसकावण्यातच गेला होता.
गुरुवारी तिसऱ्या दिवशी कालिदार पेट्रोलपंप ते पारंगे हॉस्पिटल चौकापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाई सुरू झाली आहे. या मार्गावर १५ च्या आसपास खोकी आणि पान टपऱ्या आहेत. जेसीबीच्या साह्याने आणि पोलिस बंदोबस्तात येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
दुपारी साडेबारापर्यंत तीन खोकी काढण्यात आली होती. काढलेली ही खोकी पालिकेचे कर्मचारी येथील हुतात्मा स्मारकात नेऊन ठेवत होते. या कारवाईवेळी काही खोकी धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती.