सातारा : शहरामध्ये गत काही वर्षांपासून टोळीयुद्धाने पूर्णविराम घेतला असतानाच आता पुन्हा एका बाेगदा परिसरातील मुले आणि बुधवार नाक्यावरील मुलांमध्ये वैर धुमसू लागलंय. एकमेकांच्या संगतीत असलेल्यांना हेरून मारलं जात असल्याचे समोर येत आहे. भविष्यात मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी राजवाड्यावर बोगद्यातील युवकाला बुधवार नाका परिसरातील मुलांनी पकडून कोयत्याने वार केले होते. यामध्ये संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्या दिवसापासून बोगदा आणि बुधवार नाका, असे वैरच सुरू झालं. अधून मधून या मुलांची शाब्दिक चकमक आणि मारामारी होऊ लागलीय. गत काही दिवसांपासून या दोन्ही गटांतील धुसफूस कमी झाली असतानाच आता दोन दिवसांपूर्वी मयूर मधुकर जाधव (१९, रा. कोडोली, सातारा) या युवकाला बोगदा परिसरातील चाैघांनी बेदम मारहाण केली. कारण काय तर तू बुधवार नाक्यावरील मुलांसोबत फिरतोस. हेच मयूरला मारहाणीचे कारण ठरलं. मयूर हा मित्रांसोबत कारने क्लासला निघाला होता. मित्रांच्या कारमध्ये मयूर नेहमी असतो, हे माहीत असलेल्या बोगद्यातील युवकांनी पाॅवर हाऊसजवळ त्यांची कार अडवली. कारमधून बाहेर ओढून मयूरला त्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर संबंधित मुले तेथून पसार झाली. मयूरला मारताना ते एकमेकांची नावे घेऊन मयूरला मार असं सांगत होते. त्यामुळे मयूरला त्यांची नावे समजली. त्यानंतर त्याने शाहूपुरी पोलिसांना नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी संदीप पवार, छोट्या पवार, ओंकार नलवडे, क्षितीज पवार (सर्व रा. मंगळवार पेठ, बोगदा परिसर सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यातील काहीजणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चाैकट : दोन्ही गटांवर पोलिसांचा हवा कटाक्ष..
बुधवार नाका आणि बोगदा परिसरातील युवकांमध्ये अजूनही धूसफूस सुरूच आहे. पोलिसांनी या वादाच्या निमित्ताने तरी लक्ष घालून पूर्वीच्या वादावर तोडगा काढावा. अन्यथा या दोन्ही गटांतील वैर एखाद्याच्या जीवघेण्या हल्ल्यापर्यंत जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.