खंडाळा : अहिरे (ता. खंडाळा) येथून रविवारी (दि. १४) अचानक गायब झालेली सहा वर्षीय बालिका गायत्री जमदाडे हिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. वीर धरणाच्या उजवा कालव्यात काल, शनिवारी रात्री सापडलेला छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह हा गायत्रीचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरा उजवा कालव्यात काल रात्री बालिकेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्यातून मृतदेह बाहेर काढला. अतिशय छिन्नविच्छन्न अवस्थेत मृतदेह असल्याने ओळख पटविणे अवघड झाले होते. मात्र, अहिरे येथून गायब झालेल्या बालिकेचे वर्णन व कपड्यांमध्ये साधर्म्य होते. त्या पोलिसांनी रात्री उशिरा अहिरे येथून गायत्रीच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. त्याठिकाणी तिची ओळख पटविली. पोलीस पथकांनी आज, रविवारीही पाहणी केली. गायत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गायत्रीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. घटनेच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज खंडाळा पोलीस ठाण्यात भेट दिली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना तपासासाठी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)