सातारा : वारंवार आवाहन करूनही मास्कचा वापर न करणाऱ्यांवर गुरुवारी सकाळी शहर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला. येथील बसस्थानक परिसरात पंधरा नागरिकांवर कारवाई करून संबंधितांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे एसटीत विनामास्क बसलेल्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग, पालिका व पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पालिकेकडूनही नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र, नागरिकांकडून नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. अशा निर्धास्त नागरिकांवर अंकुश लावण्यासाठी गुरुवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या पथकाने शहरात विनामास्क वावरणारे नागरिक, प्रवासी व वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून कारवाईस प्रारंभ करण्यात आला. पोलिसांच्या पथकाने अचानक एसटी बसेची पाहणी केली. यावेळी मास्क न घालणाऱ्या दोन प्रवाशांवर जागेवरच कारवाई करून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर बसस्थाकाच्या आवारात विनामास्क फिरणाऱ्या इतर १३ जणांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण १५ जणांवर कारवाई करून साडेसात हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
(चौकट)
अधिकारी दिसताच तोंडाला मास्क
सातारा पालिकेकडून मास्क वापरण्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन केले जात आहे. पालिकेचे अधिकारी दिसताच नागरिकांकडून कारवाईच्या भीतीने तोंडाला मास्क लावला जात आहे. हाच अनुभव गुरुवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईवेळी आला. पोलीस अधिकारी दिसताच अनेकांनी तोंडाला मास्क लावले. मात्र, अधिकारी गायब होताच मास्क काढून पुन्हा निर्धास्त फिरणाऱ्यांची संख्याही अधिक होती.
(कोट)
कोरोनाचे संक्रमण रोखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारक व दुकानदार, व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक
फोटो : २५ जावेद ०६/०९
सातारा शहर पोलिसांकडून गुरुवारी बसस्थानक परिसरात मास्क न लावणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. (छाया : जावेद खान)