पाऊस नाही, पाणी नाही सदान्कदा दुष्काळ आहे. शेतात काय पिकत नाही. म्हणून पुण्या-मुंबईला जाऊन नोकऱ्या करणारे असंख्य तरुण माण-खटाव तालुक्यांत नेहमीच पाहायला मिळतात; पण योग्य नियोजन करून शेती केली तर फायद्यात करता येते, हे खटाव तालुक्यातील शेनवडी येथील संजय ज्ञानदेव घोडके यांनी सिद्ध करून दाखवले आहे. संजय घोडके यांनी वडिलोपार्जित दोन एकरात भोपळ्याची लागवड करून त्यांनी तब्बल १ लाख ३० हजारांचा निव्वळ नफा मिळविला आहे.संजय घोडके दाम्पत्य सरकारी नोकरीत आहे. नोकरी सांभाळून त्यांनी शेती करण्यासाठी वेळेचे नियोजन केले आहे. नोकरीच्या ठिकाणी सुटी असली की ते शेतात जाऊन कामात तल्लीन होऊन जातात. उरमोडीचे पाणी सोडल्याने दुष्काळी भागातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पाणी नसल्याने होणारे तोटे माहीत असल्याने संजय घोडके यांनी ठिबक सिंचनचा वापर करून शेती करण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड केली. हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. झिगझॅग पद्धतीने भोपळ्याची लागवड केली. लागवड केल्यानंतर वीस दिवसांनी रोपांच्या कडेला मळी, शेणखत यांचे मिश्रण घातले. त्यानंतर एक महिन्याने खुरपणी केली. त्यानंतर ठिबक पद्धतीने पाणी दिले. पहिला तोडा ६५ दिवसांनी केला. त्यात त्यांना पाच टनाच्या आसपास भोपळा निघाला. तो सरासरी दहा ते पंधरा रुपये किलो दराने विकला गेला. दुसरा तोडा ७६ दिवसांनी केला. त्यात पद्धतीने पाच तोडे घेतले. यातून एकूण २१ टन भोपळा निघाला. यामुळे साहजिकच दोन लाख मिळाले. १ लाख ३० हजारांच्या आसपास नफा झाला.
नोकरी सांभाळून त्यांनी जपला शेतीचाही छंद
By admin | Published: March 27, 2016 9:36 PM