एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ
By दीपक शिंदे | Published: April 25, 2024 11:59 AM2024-04-25T11:59:02+5:302024-04-25T12:00:00+5:30
साताऱ्यात १९६२ ते १९९१ पर्यंत काँग्रेसचा खासदार : १९९६ साली जागा शिवसेनेने घेतली
दीपक शिंदे
सातारा : स्वातंत्र्य चळवळीत काम केलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष वाढविणाऱ्या साताऱ्यातील अनेक धुरंधरांनी या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र, अनेक वर्षे सत्ताकेंद्र असलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था सध्या अगदीच बिकट झाली आहे. काही झाले तरी पक्षाशी असलेली बांधिलकी सोडणार नाही अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतल्याने मित्रपक्षाने जागा देऊ केल्यानंतरही ती स्वाभिमानाने स्वीकारली नाही. पण, यामुळे आता मित्र पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून १९६२ पासून ते १९९८ पर्यंत केवळ १९९६ सालचा अपवाद वगळता काँग्रेसचा खासदार होता. यशवंतराव चव्हाण हे चार वेळा, प्रतापराव भोसले तीन वेळा आणि किसन वीर, अभयसिंहराजे भोसले हे या मतदारसंघातून एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे जवळपास ३५ वर्षे जिल्ह्यात काँग्रेसकडेच सत्ता होती. प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसच्या नेत्यांकडे जाऊन मागणी करावी लागत होती. अनेक विकासकामे या काळातही झाली. सैनिक स्कूल, कऱ्हाड मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, साखर कारखानदारी यामुळे या भागाचा विकास होण्यास मदतच झाली.
१९५२- सातारा आणि सांगली असे दोन जिल्हे एकत्र असलेल्या या मतदारसंघात दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे दोन मतदारसंघ होते. यापैकी दक्षिण सातारा संबोधल्या जाणाऱ्या सातारा परिसरातील मतदारसंघातून काँग्रेसचे व्ही. पी. पवार हे विजयी झाले होते.
१९५७ - भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्यांनी जे. एस. आळतेकर यांचा पराभव करून पहिल्यांदा साताऱ्यात कम्युनिस्टांचा झेंडा रोवला.
१९६२ - काँग्रेसकडून लढत असताना किसन वीर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करत हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.
१९६७ - किसन वीर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. तेव्हापासून सलग चार वेळा १९७१, १९७७ आणि १९८० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
१९८४ पासून काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांनी तीनवेळा १९८९, १९९१ पर्यंत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.
१९९६ मध्ये उदयनराजे भोसले यांनी अपक्ष म्हणून लढताना १ लाख १३ हजार मते घेतल्यामुळे शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा विजय झाला.
१९९८ मध्ये अभयसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेतला.
१९९९ - राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी सलग दोन वेळा २००४ पर्यंत तर उदयनराजे भोसले यांनी तीन वेळा २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या श्रीनिवास पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
काँग्रेस अशी अवस्था का झाली?
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काही महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत गेले.
- काँग्रेसचे नेतृत्व करणारे नेते यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव कमी झाला.
- केंद्रीय नेतृत्व दिल्लीत अडकून पडले. तर राज्यात शिवसेना - भाजपचे सरकार आल्यानंतर तसेच त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना जुळवून घेताना अडचणी निर्माण झाल्या.
- महाआघाडीच्या निमित्ताने काही जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्या. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा एकूणच प्रभाव कमी झाला.