सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही. शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान होत असून ही गंभीर बाब आहे. त्यासाठी आम्ही रायगडावर निघालो असून तेथे छत्रपतींच्या समाधीजवळ जाऊन आम्ही वेदना मांडणार असून आत्मक्लेष करणार असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.निर्धार शिवसन्मानाचा या माध्यमातून रायगडावर जाऊन उद्या (शनिवारी) छत्रपतींच्या समाधींसमोर उदयनराजे आत्मक्लेष करणार आहेत. त्यासाठी त्यांनी आज रायगडकडे कूच केली आहे. जलमंदीर पॅलेस या निवासस्थानातून निघाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर पोवईनाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व रायगडकडे मार्गस्थ झाले.उदयनराजे म्हणाले, ''कोणत्या व्यक्तीविरोधात आमचे हे पा॒ऊल नाही. पण, शिवाजी महाजारांचा अपमान होतोय. याविरोधात कोणीतरी बोलले पाहिजे. मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही. त्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. ज्या घराण्याचे नाव लावताना मी आवाज उठवला नाही. आम्ही नैतिक दृष्ट्या राहू शकत नाही. माझ्या उदयन या नावापुढे राजे लावतो. ज्यांच्यामुळे हे पद, सन्मान मिळाला ते नाव लावायचा मला अधिकार नाही. केवळ त्यांचाच अवमान नाही, तर जे महापुरुष ज्यांनी स्वत: आयुष्य वेचलंय. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आज विविध चळवळी, संघटना वाटचाल करत आहेत. त्यांनी योगदान दिले. त्यांची सुद्धा आज घुसमट होत आहे.छत्रपतींचा अवमान करत असतील तर हा अपमान आम्ही कदापी सहन करु शकत नाही. या लोकांचे मोठे उपकार व योगदान आहे. प्रत्येक चांगल्या कार्याला सुरवात करतात. त्या छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान होतो ही गंभीर बाब असून त्यातून आम्हाला वेदना होत आहेत. त्यामुळे आत्मक्लेष करण्यासाठी आम्ही रायगडावर निघालो आहे. त्या ठिकाणी जाऊन वेदना मांडणार आहोत'', असं उदयनराजेंनी सांगितलं.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करत उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले होते. आता छत्रपतींच्या समाधींसमोर आत्मक्लेष करणार असल्याचंही उदयनराजेंनी सांगितलं आहे