लक्ष्मण गोरे ।बामणोली : सातारा तालुक्यातील सांबरवाडी अवघ्या नव्वद उंबऱ्यांचे गाव. या भागात आरोग्याच्या सुविधाही फारशा मिळत नाहीत. तेथील ग्रामस्थांसाठी योगा सर्वोत्तम पर्याय आहे. हे ओळखून शिक्षक प्रल्हाद पारटे यांनी एक वर्षापूर्वी योगा वर्ग सुरू केले. गावकऱ्यांनाही आता आवड निर्माण झाली असून, ग्रामस्थ पहाटेच योगासाठी येतात. सांबरवाडी आता ‘योगा ग्राम’ म्हणून ओळखले जात आहे.
भारताची योग शिक्षणाची परंपरा हजारो वर्षे जुनी आहे. ही परंपरा सुरुवातीच्या काळात गुरू शिष्यांपुरती मर्यादित होती. २१ व्या शतकात योग साधनेची गरज सर्वांनाच आहे, हे जगाला समजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा ठराव मांडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा, अशी मागणी केली. त्याला १७७ देशांनी पाठिंबा देऊन २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
सांबरवाडी शाळेत प्रल्हाद पारटे या मुख्याध्यापकाने गावच योगा ग्राम बनवून आदर्श घालून दिला. एक वर्षापूर्वी त्यांची या गावात बदली झाली. नव्वद कुटुंबे असलेल्या या गावात पारटे यांनी प्रथम विद्यार्थी, ग्रामस्थांना विश्वासात घेतले. त्यांना योग विद्येमुळे आजारांपासून कशी मुक्ती मिळते, याची स्वत:बद्दलची सविस्तर माहिती ग्रामस्थांना पटवून दिली. त्यांनी दररोज सकाळी शाळेतच योग वर्ग सुरू केला. ग्रामस्थ व महिलाही सहभागी होऊ लागल्या.पुस्तके भेट देऊन प्रचारत्यांचे हे कार्य वर्षापासून विना मोबदला सुरू आहे. दिवाळी व उन्हाळी सुटीतही त्यांचा योगा वर्ग सुरू असतो. गेल्या दोन वर्षांपासून योगाच्या प्रचारासाठी ते विवाह, बारसे अशा कार्यक्रमांना जाऊन नवविवाहित जोडप्यांना योगाचे पुस्तक मोफत भेट देतात. दोन वर्षांत किमान २५० पुस्तके त्यांनी मोफत भेट देऊन योगाचा प्रचार केला आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने साताºयात आयोजित कार्यक्रमात ते महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
मी पहिल्या दिवशी योगा शिकायला आले आणि मनाला समाधान वाटले. मला चालताना खूप त्रास व्हायचा कंबर व गुडघे खूप दुखायचे. माझे वय ७६ आहे. योगासनामुळे गुडघेदुखीचा त्रास खूप कमी झाला. माझे वजनही ७३ वरून ६४ किलो झाले आहे.- मालाबाई खाशाबा भणगे, सांबरवाडी
मी दररोज सकाळी सात वाजता सांबरवाडीत जाऊन विद्यार्थी, पालकांना योगाचे धडे देत आहे. यात गावातील अनेक युवक, युवती व प्रौढ व्यक्तींचा सहभाग असतो. योगासनामुळे शरीर सदृढ राहण्यास तर प्राणायाम ध्यान, मन विकसित करण्यास मदत करते. विद्यार्थ्यांनी योगासने केल्याने अभ्यासात प्रगती होते.- प्रल्हाद पारटे, मुख्याध्यापक सांबरवाडी