सातारा : प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक आरोग्यदूत बनून रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक ठरलेल्या ऑक्सिजनच्या टँकरवर चालक म्हणून साताऱ्यातील पाचजणांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व सध्या आरोग्य सेवा बजावत आहेत.
कोविडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने १४४ कलम लागू केले आणि अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांचे चलनवलन ठप्प झाले. याचा सर्वाधिक फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला म्हणजेच ‘एसटी’ला बसला. दुसऱ्या बाजूला पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या आणि त्यातही गंभीर रुग्णसंख्या वाढल्याने सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला. केवळ उपचाराअभावी रुग्णांना जिवाला मुकावे लागू नये म्हणून प्रशासनाने राज्यात मिळेल तेथून रात्रीचा दिवस करून ऑक्सिजनचे टँकर आणायला सुरुवात केली. त्यासाठी खासगी कंपनीच्या टँकरवर एस.टी. चालक सेवा बजावत आहेत.
पल्ला लांबचा आणि वेळ कमी असल्याने रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या खासगी टँकरवर पहिल्यांदाच आता एस.टी.चे चालक कर्तव्य पार पाडत आहेत. महामंडळाच्या सातारा आगारातील सुरेश जगताप, एस. एस. निंबाळकर, आर. जी. कदम, के. डी. वाघ व हेमंत काकडे हे चालक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या नव्या ड्यूटीवर रुजू झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने सातारा आगाराला कुशल चालक मागितले होते. त्यानुसार या पाच कौशल्यप्राप्त चालकांच्या ड्यूट्या अतिअत्यावश्यक सेवेसाठी खासगी टँकरवर लावण्यात आल्या आहेत.
मुंबई, चाकण, बेल्लोरी (कर्नाटक) या ठिकाणाहून हे चालक राज्यात विविध ठिकाणी १२ ते १८ टनांचे टँकर घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहेत. खासगी चालकांच्या साथीने हे चालक अविरत सेवा देऊन ऑक्सिजन वेळेच हॉस्पिटलला पोहोचवण्याचे काम करीत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रारंभात साताऱ्यातून २७ प्रवाशांना घेऊन महामंडळाची बस बांगला देशच्या सीमेवरील गावात जाऊन आली होती. काही हजार किलोमीटरचा जाऊन-येऊनच प्रवास त्यांनी अवघ्या पाच दिवसांत केला होता. या बसचे सुकाणू चालक सुरेश जगताप व एस. एस. निंबाळकर यांच्या हातात होते. सुरक्षित व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बांधवांनी दाखविलेले कौशल्य लक्षात घेऊन त्यांची या अतिअत्यावश्यक सेवेसाठी निवड करण्यात आली आहे.
कोट :
कोविड काळात सगळेजण जेरबंद असताना सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं असं मी मानतो. आमचे कौशल्य म्हणा किंवा आम्हांला प्रोत्साहित करण्यासाठी ही नेमणूक आहे, असे समजून आम्ही टँकरवर सेवा देत आहोत. हीच रुग्णसेवा आम्ही समजतो.
- सुरेश जगताप, एसटी बसचालक, सातारा आगार