सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, मसूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सह्याद्री कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, माजी सभापती शालन माळी, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मानसिंगराव जगदाळे म्हणाले, परजिल्ह्यातून आलेल्या सर्व ऊसतोड कामगारांचे पालकत्व म्हणून आपली जबाबदारी आहे. कामगार जरी असला तरी तो आपला माणूस आहे, या दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी सह्याद्री कारखान्याच्या वतीने शिबिराचे आयोजन केले जाते. यामध्ये ऊसतोड मजूर, टोळी मुकादम, ट्रॅक्टर चालक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरीच्या काळात कमी झाला होता. मात्र, सध्या पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.
कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, नडशीचे सरपंच गोविंदराव थोरात, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, डॉ. राजेंद्र डाकवे, वैशाली पाटोळे उपस्थित होते. संभाजी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश जाधव यांनी आभार मानले.