लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून त्यांना चांगली सेवा मिळावी यासाठी आता शासनाच्या आदेशाने दर चार तासांनी बाधितांची आरोग्य तपासणी होणार आहे. यामध्ये तापमान, श्वसन दर, नाडीचे ठोके, ऑक्सिजन पातळी तपासणी होणार आहे. यामुळे रुग्णाला चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा कोरोना सेंटर तसेच कोरोना केअर सेंटरला सूचना केली आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या पत्रान्वये कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना बाधित प्रत्येक नागरिकाची दर चार तासांनी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये रुग्णाच्या शरीराचे तापमान पाहिले जाणार आहे. तसेच श्वसन दर आणि नाडीचे ठोके व्यवस्थित पडतात का याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन पातळी पाहण्यात येईल. पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन दिल्यानंतरही ९३ टक्के सॅच्युरेशन येत नसल्यास रुग्णाला पुढील आरोग्य केंद्रात हलविण्यात यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक ५० रुग्णांच्या मागे एका ऑक्सिजन सिस्टरची नियुक्ती करण्यात यावी, असे सुचविण्यात आले आहे. या ऑक्सिजन सिस्टरने दर चार तासांनी प्रत्येक रुग्णाला भेटणे अपेक्षित आहे. तसेच कोरोना रुग्णांच्याबाबत हलगर्जीपणा करू नये, याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती दोन दिवसांत सादर करावी, अशी स्पष्ट सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केली आहे.