फलटण : फलटण तालुक्यातील अनेक गावांत मागील काही दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, गोचडी ताप या आजाराची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडूनही प्रशासन व आरोग्य विभागाकडून कोणतीही दक्षता घेतली गेली नाही. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
फलटण तालुक्यातील काही गावांत गेल्या महिन्यापासून डेंग्यू व इतर तत्सम आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. उलट्या, जुलाब, तापासह मलेरिया रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे. अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. गावातील आजारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्ण सरकारी व फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अद्यापही या आजाराविषयी शासकीय यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र संबंधित आजारांविषयी फ्लेक्स, पत्रके, दवंडी, सूचना, जनजागृती, औषधे फवारणीसारखी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
डेंग्यू या आजारांची साधारण लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड आदीद्वारे रक्तस्राव, उलट्या, मळमळ अशा प्रकारची दिसून येतात व ही लक्षणे आढळल्यास लोकांनी ताबडतोब सरकारी व खासगी दवाखान्यात जाऊन तपासणी करून औषधोपचार करून घेणे गरजेचे आहे. तसेच लोकांनी घरांमध्ये व परिसरात घरगुती वापरासाठी साठवलेले पाणी रांजण, हौद, डबे, उघड्या टाक्या तसेच आदी वस्तूंमध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये या डासांच्या विषाणूचा प्रसार होत असतो. त्यामुळे लोकांनीही वेळीच खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे. नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील, उपकेंद्रातील आरोग्य सेवक, इतर आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावागावांत जाऊन लोकांना या रोगांविषयी व रोगप्रतिबंधक उपाययोजनाविषयी जनजागृतीद्वारे माहिती दिली गेली पाहिजे, अन्यथा आजारात वाढ होऊ शकते, हे माहिती असूनही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून मात्र असे काही होताना दिसत नाही. शासकीय यंत्रणा सुस्त पडली आहे, कोरोनामधून तालुका सावरत असताना आता इतर रोगांनी जनता त्रस्त होऊ लागली आहे.
(कोट)
पावसाळ्यात अनेक आजार पसरत असतात आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. मात्र गाव पातळीवर पण प्रशासन आणि ग्रामपंचायतीने जनजागृती केली पाहिजे. औषधांची फवारणी केली पाहिजे, आमची यंत्रणा सर्वत्र कार्यन्वित आहे. दररोज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे. पुरेसा औषध साठा आहे. रुग्णांनी आजारी पडल्यास आरोग्य सेवक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.
-डॉ. विक्रांत पोटे, तालुका आरोग्य अधिकारी, फलटण