सातारा : मराठा समाजाच्या लेकरांपेक्षा माझी तब्येत महत्त्वाची नाही. पुढील सर्व नियोजित रॅली, सभा ठरल्यापुसार पार पडतील. जिथे रॅली असेल तिथे मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. दरम्यान, त्यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नितेश राणे तसेच आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून प्रकृती स्थीर असल्याची माहिती देत पुढील नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली.
नितेश राणे यांनी आधुनिक मोहम्मद जीना असल्याचे तसेच दाढीवर आक्षेप घेतला असल्याचे विचारताच जरांगे-पाटील म्हणाले, त्यांनी सर्वच दाढी राखणाऱ्यांवर आक्षेप घेतला असेल. दाढी राखणं हे मर्दाचे लक्षण आहे. त्यांचा सन्मान करतो, परंतु, सन्मान शब्दाचा अर्थ त्यांना कळत नाही. ते बोलतात, पण शब्द फडणवीस यांचे आहेत. फडणवीस हे मराठ्यांच्या अंगावर मराठ्यांना सोडत आहेत.
जरांगे यांच्या आडून शरद पवार राजकारण खेळत असून दंगलीची शक्यता राज ठाकरे यांनी वर्तवली असल्याबाबत जरांगे-पाटील म्हणाले, त्यांनी वर्तवली म्हणून थोडीच दंगल होणार आहे ? गाड्या-फोडणाऱ्यांच्या विचारांनी राज्य चालत नाही. कोठेही दंगली होणार नाहीत. राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नसेल परंतु, गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. एअर कंडिशनमध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत कळणार नाही. त्यांनी मराठा युवकांनाच विचारावं की आरक्षणाची गरज आहे की नाही. प्रत्येकवेळी तुमचे विचार जनतेवर लादू नका.
महेश शिदे यांची टीव्ही त्यावेळी जळली असेलबारामतीकरांचे सरकार होते, तेव्हापासून तीव वर्षे तुम्ही झोपेत होता अशी टिका आमदार महेश शिंदे यांनी केल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता जरांगे-पाटील म्हणाले, त्यावेळी महेश शिंदे यांची टीव्ही जळली असेल, त्यामुळे कदाचित त्यांना माहित नसेल. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळीही सध्याच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त फजिती केली होती. त्यांना जातीपेक्षा पक्ष मोठा वाटतो. पण जेव्हा निवडणुकीत पडतील, तेव्हा जातीची किंमत कळेल. जितके मराठ्यांच्या मागे लागेल तितका त्रास होईल, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.
जरांगे-पाटील म्हणाले...
- पहिल्या दिवसांपासून ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठा पूर्वीपासून ओबीसीत आहे.- अजित पवार वर्ष झाले तरी आरक्षणावर तोडगा काढताहेत. तुमच्या हातातच सत्ता.
- शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वंशज, त्यांच्याविरोधात उमेदवार नसेल.- ११३ आमदार पाडणार पण नेमके कोण हे आताच सांगणार नाही.
- प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत नेहमीच आदर आहे. त्यांनी जनभावना लक्षात घ्यावी.- सगेसोयऱ्यांना आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्तीची अधिसुचना, तातडीने अंमलबजावणी व्हावी.