सचिन काकडे
कोरोना म्हटलं की भल्याभल्यांना दरदरून घाम फुटायचा. एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळ जाण्यासाठी कोणी धजावतही नव्हतं. अशा कठीण प्रसंगात सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध आरोग्यपूर्ण लढा दिला आणि आजही देत आहेत. आपण जो कचरा संकलित करतोय, ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावतोय त्यामध्ये कोरोनाबाधितांचा कचरा आहे किंवा नाही, याची कल्पनाच मुळी कोणाला नव्हती; तरीही जोखीम पत्करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अन् नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य तर दिलेच शिवाय कोरोना लढ्यात महत्त्वाची भूमिकाही बजावली.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. ही लाट थोपविण्यासाठी अंगणवाडी सेविका ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण मोलाची भूमिका बजावत आहेत. पालिकेचे आरोग्य कर्मचारीदेखील या लढ्यात योगदान देत आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर तो परिसर स्वच्छ व निर्जंतुक करण्यापासून ते कोरोनाने दगावणाऱ्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामाची जबाबदारी प्रचंड प्रमाणात वाढली. शहर स्वच्छतेचे काम करण्याबरोबरच शहरातील कुटुंबांचा सर्व्हे करणे, कोरोना रुग्णांचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्र करणे, अत्यावश्यक सेवा लोकांना घरपोच करणे अशी सर्व प्रकारची कामे या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हिमतीने केली.
कोरोनाविरुद्ध लढा देताना अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाले. मात्र कोरोनावर यशस्वी मात करून त्यांनी धीरोदात्तपणे आपला लढा सुरूच ठेवला आहे. संकट अत्यंत गंभीर होते तरीही कर्मचाऱ्यांनी त्याचा गंभीरपणे सामना केला. आज गतवर्षीच्या तुलनेत परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. रुग्णालयात कमी आणि घरातच उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. तरीही कर्मचारी स्वतःसह शहरवासीयांच्या सुरक्षेची काळजी कुटुंबाप्रमाणे घेत आहेत.
(कोट)
पालिकेचा प्रत्येक कर्मचारी व अधिकारी वर्षभरापासून कोरोना प्रतिबंधाच्या कामात व्यस्त आहे. जो-तो आपले काम जबाबदारीने करीत आहे. कोरोनाच्या विळख्यातून सुरक्षित बाहेर आल्यानंतरदेखील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाला थोपविण्यासाठी आपला आरोग्यपूर्ण लढा सुरूच ठेवला आहे. या लढ्यात मोलाची भूमिका बजावत असलेल्या प्रत्येकाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी
फोटो :