कोयनानगर : मंडणगड-मिरज याबसच्या वाहकाला पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे धावत्या एसटीत हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही घटना लक्ष्यात आल्यावर चालकाने तातडीने नवारस्ता येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र तत्पुर्वीच चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. वाल्मिकी शंकर कोळी असे वाहकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या मंडणगड (जि. रत्नागिरी) आगारातून शुक्रवारी सकाळी नऊ वाजता निघालेली मंडणगड-मिरज ही एसटी पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे आली असता गाडीतील वाहक वाल्मिक शंकर कोळी (वय ४२, रा पोतले ता. कऱ्हाड) यांच्या छातीत दुखू लागले. कोळी यांनी ही माहिती चालकाला दिली. त्यानंतर चालकाने तातडीने गाडी थांबवून नवारस्ता येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र वाल्मिक कोळी यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
मल्हारपेठ पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, वाल्मिक कोळी हे पाच वर्षांपूर्वी एसटी सेवेत वाहक कम चालकपदी सेवेत रुजू झाले होते. त्यांना मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
काही मिनिटापूर्वीच कोळी हसत जेवले होतेकऱ्हाड-चिपळूण या महामार्गावरून धावणारी ही गाडी प्रवाशांनी खचाखच भरली होती. मंडणगड ते नवारस्ता या तीन ते चार तासांच्या प्रवासात वाहक कोळी प्रवाशांच्या गराड्यात होते. निधन होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर प्रवाशी आणि चालक यांच्या समवेत पाटण येथे हसत गप्पा मारत त्यांनीही जेवन केले होते. त्यानंतर अचानक त्यांना त्रास होऊ लागला अन् मृत्यू झाला. यामुळे एसटीतील प्रवाशांना अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे एसटीतील सर्व प्रवाशी नवारस्ता येथे दोन ते तीन तास थांबून राहिले. त्यानंतर चालकाने सर्वांची सोय करून येईल त्या गाडीने प्रवाशांना सुरक्षित पोहोच केले.