म्हसवड : गेल्या काही दिवसात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला असणारे थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत तसेच ऊसाच्या रसाची दुकाने लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहेत. वातावरणात उकाडा असल्यामुळे घरातच लिंबू सरबताचा आनंद अनेक कुटुंब घेत आहेत.
घंटागाडीची मागणी
सातारा : शहरात अनेक ठिकाणी घंटागाडी थांबत नसल्याने नागरिकांना घंटागाडीची वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी घंटागाड्या लगेच निघून जातात. त्यामुळे घरात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. कोविड काळात चार-पाच दिवस घरात घाण ठेवणं आरोग्याला अपायकारक आहे. हा कचरा रस्त्यावर टाकला तरी तो घातक असल्याने घंटागाडी थोडी जास्त वेळ उभी करावी, अशी मागणी होत आहे.
चोरट्यांच्या बंदोबस्ताची मागणी
वाई : विहिरीवरील विद्युतपंप तसेच ट्रान्सफॉर्मरमधील तारांची चोरी होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. याचबरोबर घरातील अंगणात पडलेल्या गृहोपयोगी साहित्याचीही चोरी होत आहे. भुरट्या चोऱ्यांबाबत फारशा तक्रारी होत असल्याने भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. कोविड काळात विविध कारणांनी बेरोजगार झालेल्या अनेकांना यातून पैसे मिळत असल्याचे समोर येत आहे.
कलिंगडांना मागणी
फलटण : उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या कलिंगडांना चांगलीच मागणी वाढली आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या कलिंगडांना मागणी अधिक आहे. सध्याची वेळेची मर्यादा लक्षात घेता, सकाळी लवकर कलिंगड आणले जाते. दुपारी उन्हाचा पारा वाढला की मीठ आणि चाट मसाला लावून फ्रीजमध्ये ठेवलेले कलिंगड खाण्याचा आनंद नागरिक घेत आहेत.
चिमण्यांना पाणी
वडूज : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे चिमण्यांचे हाल होत आहेत. शहरात काही ठिकाणी भांड्यात पाणी ठेवून त्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकांनी घराचे अंगण, स्लॅप यासह वळचणीलाही चपट्या भांड्यांमध्ये पाणी ठेवले आहे. हे पाणी पिण्यासाठी पक्षी येतात.
दूध व्यवसाय अडचणीत
म्हसवड : माण तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, आता त्याचा फटका शेतकऱ्यांचा जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसायालाही बसत आहे. कोविड काळात शासनाने ठराविक वेळेची मर्यादा घातली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून दूध संकलन करून त्याचे वितरण करण्यासाठी तारेवरची कसरत दूध व्यावसायिकांना करावी लागत आहे.
उन्हाळ्याचे विकार वाढले
फलटण : दिवसेंदिवस सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे मोठ्या व्यक्तींसह लहान मुलांना उन्हाळी विकार त्रासदायक ठरू लागले आहेत. किरकोळ सर्दी, ताप, खोकला असल्यासही कोविड समजून उपचार करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून औषधे घेण्याचे प्रकार वाढले आहेत.
..............................