पुसेगाव : पुसेगाव व परिसरातील विविध गावांत सोमवारी सायंकाळी उन्हाळी मान्सूनपूर्व पावसाने विजेच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावली. या पावसामुळे वीटभट्टी मालकांचे मात्र अतोनात नुकसान झाले.
सोमवारी सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला असला तरी शेतकरी व वीटभट्टी मालकांना मात्र या पावसाचा मोठा फटका बसला आहे.सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुसेगाव व परिसरातील बुध, राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी, उंबरमळे, निढळ, कटगून, खातगूण, विसापूर, वर्धनगड, पवारवाडी, नेर या भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली.
सध्या शेतात रब्बी हंगामातील पिकांची सुगी काही ठिकाणी सुरू आहे. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचा कडबा अद्याप शेतात पडून आहे. या पावसाने हा कडबा पूर्णपणे भिजला आहे. काही ठिकाणी कांद्याची काढणी व काटणी शेतात सुरू आहे, या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. अवकाळी पावसाने भरात आलेल्या आंबा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.