सातारा : जिल्ह्याला मे महिन्यात वळवाचा फटका बसल्यानंतर आताही अतिवृष्टीचाही दणका बसला आहे. वाई, सातारा, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसामुळे २०७ घरांची पडझड झाली. तर १३ जनावरेही मृत झाली आहेत. यामुळे बळीराजाचेही नुकसान झाले आहे. सध्या अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाॅंधार पाऊस पडतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. तसेच भूस्खलन होऊन गावांना धोका निर्माण होतो. आताही मागील आठवड्यात पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच रस्ते खचले, भूस्खलन झाले. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. या अतिवृष्टीचा फटका पाटण, महाबळेश्वर, वाई, आणि सातारा तालुक्याला अधिक करुन बसला.
पावसात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. त्यातच अजुनही पश्चिमेकडे पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आणखी नुकसान होण्याचा अंदाज आहे. सध्यातरी जिल्ह्यात अतिवृष्टीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पंचनाम्यानंतरच अधिकृत नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.मागील आठवड्यातील अतिवृष्टीत पश्चिम भागातील २०७ घरांना फटका बसला. यामध्ये पाटण तालुक्यातच अधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात १३५ घरांना दणका बसला. तर सातारा तालुक्यात ४९ घरांचे नुकसान झाले. वाई तालुक्यात १४ तर महाबळेश्वर तालुक्यातही ९ घरांना फटका बसलेला आहे. त्याचबरोबर काही भागात शेतीचेही नुकसान झाले आहे. त्याबाबत अजून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व पंचनामे झाल्यानंतरच अतिवृष्टीतील नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.सातारा, पाटणमध्ये जनावरे मृत..अतिवृष्टीचा फटका माणसांना बसला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही नुकसानीस सामोरे जावे लागले. कारण, पावसामुळे लहान आणि मोठ्या मिळून १३ जनांवरांचा मृत्यू झाला. सातारा आणि पाटण तालुक्यातच जनावरे दगावली. निकषानुसार जनावरांच्या मृत्युसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे.
अवकाळी व वळीव पावसात १५६ घरे, गोठा शेडचे नुकसान..जिल्ह्यात एप्रिल ते जून महिन्यादरम्यान अवकाळी व वळवाचा पाऊस झाला होता. त्यावेळी पावसाबरोबर जोरदारे वारे वाहत होते. तसेच वीजाही पडल्या. यामध्ये १५६ घरे, गोठा आणि शेडचे नुकसान झाले होते. ४ शाळा, प्रत्येकी एक वाहन आणि पोल्ट्री शेडलाही फटका बसलेला. तसेच पाऊस आणि वीजा पडून १२ मोठी जनावरे, सुमारे ४० लहान पशुधन आणि १० कोंबड्याही मृत झालेल्या. तर वीज अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचे समाेर आले होते.