सातारा : विजयदशमीनिमित्ताने साताऱ्याची बाजारपेठ बुधवारी चांगली फुलली आहे. ग्रामीण भागातून शेतकरी झेंडूची फुले, आपट्याची पाने विक्रीसाठी घेऊन आले आहेत. ग्राहकांचीही गर्दी सुरू असतानाच दुपारी अडीचच्या सुमारास काळे ढग जमा झाले. काही वेळात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.साताऱ्यात गणेशोत्सवाएवढेच दसऱ्याला महत्त्व आहे. चौकाचौकात तरुण मंडळांनी दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांची लगबग सुरू आहे. तसेच ग्रामीण भागातून झेंडू, आपट्याच्या पानांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. दारावर तोरण, गाड्यांना हार करण्यासाठी झेंडू खरेदीसाठी साताऱ्याच्या बाजारपेठेत बुधवारी सकाळपासूनच गर्दी झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून कडक उकाडा जाणवत आहे. तसेच अधूनमधून ढग येत असले तरी पाऊस पडत नसल्याने सातारकर छत्र्या, रेनकोट न आणताच बाजारात आले असतानाच दुपारी अडीचच्या सुमारास काळे ढग जमा होऊ लागले.
काही वेळेत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे विक्रीसाठी आणलेल्या वस्तू भिजू नयेत म्हणून त्यावर काहीतरी झाकण्यासाठी व्यापाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. त्याचप्रमाणी ग्राहकांचीही पळापळ झाली. सुमारे अर्धातास चांगलाच पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साठले होते.