सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाची उघडझाप सुरू होती. पण, गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १२३ तर महाबळेश्वरला १०४ मिलमीटरची नोंद झाली. तर आता नवजाच्या पावसानेही एक हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला असून कोयना धरणातील पाणीसाठाही १७ टीएमसीजवळ पोहोचला आहे.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. सुरुवातील पूर्व तसेच पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. पण, त्यानंतर पूर्वेकडे उघडीप राहिली. तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस पडला. यामुळे ओढे खळाळून वाहू लागले.त्याचबरोबर पश्चिम भागातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखी मोठी धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही हळूहळू वाढू लागलेला. पण, मागील मंगळवारपासून पावसाचा जोर कमी झाला होता. परिणाणी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावलेली. मात्र, गुरुवारी रात्रीपासून पाऊस पुन्हा जोर धरत असल्याचे चित्र आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर नवजाला १२३ आणि महाबळेश्वरमध्ये १०४ मिलीमीटर पाऊस पडला. एक जूनपासूनचा विचार करता नवजाच्या पावसानेही एक हजार मिलीमीटरचा टप्पा पार केलेला आहे. नवजाला आतापर्यंत १०२७ मिलमीटरची नोंद झाली. तर महाबळेश्वरचा पाऊस ११२९ मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. त्यातच शुक्रवारी सकाळपासूनही या भागात पाऊस सुरुच होता. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ५१७२ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा १६.५४ टीएमसी झाला होता. सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठा वाढत आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणांतही पाण्याची आवक हळूहळू सुरू आहे. तर पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी पूर्वेकडील खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे.
साताऱ्यात सकाळपासून रिपरिप...सातारा शहर आणि परिसरातही गुरुवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून तर रिपरिप सुरू होती. त्यातच ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. दुपारपर्यंत सातारकरांना सूर्यदर्शन घडले नाही. सततच्या पावसामुळे सातारकरांना रेनकोट परिधान केल्याशिवाय बाहेर पडता आले नाही.