सातारा : सातारा शहरात आज, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.साताऱ्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अशातच आठच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुमारे एक तास पाऊस सुरूच होता. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास काळे ढग जमा झाले. काही वेळेत अचानक पावसाने झोडपून काढले. अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाण्याचे लोट वाहून आल्याने माची पेठ, केसरकर पेठ, बोगदा या भागातील नाले तुडुंब भरून वाहिले.दिवाळीच्या निमित्ताने साताऱ्याची बाजारपेठ फुलली आहे. अचानक पाऊस झाल्याने वस्तूंचे नुकसान होऊ नये यासाठी विक्रेत्यांना पळापळ करावी लागली. दुपारी ऊन पडले होते. त्यामुळे पावसाचा अंदाज नसल्याने छत्री, रेनकोट न घेता बाहेर पडलेले तसेच त्याचवेळी अनेक शाळा सुटल्याने मुलांची पळापळ झाली होती.
साताऱ्यात विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाचा तडाखा
By सचिन काकडे | Published: October 13, 2022 4:54 PM