सातारा : जिल्ह्यात उशिरा का असेना मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली असून पश्चिमेकडे दमदार सुरुवात आहे. त्यामुळे काेयना धरणात आवक सुरू झाली असून पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ४०५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली असून पूर्वेकडे मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.चक्रीवादळामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिलेली. असे असतानाच तीन दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. पूर्व तसेच पश्चिम भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे, नाले वाहू लागल्याने धरणांत पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यातच मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला २६ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला ३६ आणि महाबळेश्वरला सर्वाधिक ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पश्चिम भागात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी भात लागण तसेच पेरणीचीही तयारी केली आहे. साताऱ्यात जोरदार पाऊस...सातारा शहरासह परिसरात चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस अशीही स्थिती असते. सोमवारी पावसाची बऱ्यापैकी उघडीप होती. मात्र, मंगळवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास सातारा शहरात जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लाेट वाहिले. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालेले.
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस, महाबळेश्वरमध्ये 'इतक्या' मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद
By नितीन काळेल | Published: June 27, 2023 12:45 PM