सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवांधार पाऊस सुरु असून नवजा आणि महाबळेश्वरचे पर्जन्यमान तीन हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर आले आहे. तर याच ठिकाणी तीन आठवड्यात जो पाऊस पडला तो या आठवड्यातच झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर लक्षात येत आहे.जिल्ह्यात पाऊस सुरू होऊन एक महिना झाला आहे. २५ जूनला मान्सूनचा पाऊस सक्रीय झाला. पण, पश्चिम भागातच या पावसाने आतापर्यंत चांगली हजेरी लावली आहे. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. मागील आठवड्यात १७ जुलैपर्यंत नवजा येथे फक्त १५५९ तर महाबळेश्वरला १५१७ मिलीमीटर पर्जन्यमान झाले होते. पण, गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला. पहिल्या तीन आठवड्यात पाऊस झाला त्याच्या जवळपास दुप्पट अवघ्या आठवड्यात झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत नवजा येथे २९२२ आणि महाबळेश्वरला २८३६ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून दरडप्रवण भागातील ४८९ कुटुंबांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे.
Satara: २१ दिवसातील पाऊस; एक आठवड्यात, नवजा, महाबळेश्वरचा पाऊस तीन हजार मिलीमीटरजवळ
By नितीन काळेल | Published: July 24, 2023 7:22 PM