सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस कोसळधार राहिल्याने साेमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला तब्बल २७४ तर कोयनेला १८७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणातही सुमारे ४८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. परिणामी धरणसाठा ४०.४३ टीएमसी झाला. तर जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, वाई, जावळी आणि सातारा तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे.जिल्ह्यात मागील सवा महिन्यापासून पाऊस सुरू झाला आहे. तरीही जुलै महिना अर्धा संपलातरी पावसाचा म्हणावासा जोर नाही. त्यामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला नाही. अजूनही ही धरणे तळालाच आहेत. यासाठी संततधार पावसाची गरज आहे. तर सध्या कोयना धरणातच बऱ्यापैकी पाणीसाठा झालेला आहे. कारण, धरणक्षेत्रात सतत पाऊस होत आहे. त्यातच शनिवार आणि रविवारी पश्चिम भागात कोसळधार होती. यामुळेही धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे तब्बल २७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी पर्जन्यमान झाले. तसेच कोयनानगर येथेही १८७ मिलीमीटर पाऊस पडला. या तुलनेत महाबळेश्वरला कमी पर्जन्यमान झाले. २४ तासांत अवघा ९९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर पश्चिम भागात आणि विशेषत: करुन कोयना धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कोयनेत सोमवारी सकाळच्या सुमारास ४८ हजार ६११ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ४०.४३ टीएमसी झालेला. पश्चिमेकडील या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तसेच ओढे-नाले भरुन वाहत आहेत. पूर्व दुष्काळी तालुक्यात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
कोयनेचा पाणीसाठा ४० टीएमसीकडेकोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास धरणात ३६.२३ टीएमसी पाणीसाठा झालेला. तर सोमवारी सकाळी पाणीसाठ्यात चार टीएमसीहून अधिक वाढ झाली. पाणीसाठा ४०.४३ टीएमसी झाला होता. जूनपासून आतापर्यंतची ही सर्वाधिक पाणीसाठा वाढ ठरली आहे. त्यामुळे लवकरच धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीचा टप्पाही गाठणार आहे.