सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असून बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत कोयनानगरला १६५, तर महाबळेश्वरला १५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी बुधवारी सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणात पावणे सहा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे धरणसाठा ३४ टीएमसीवर गेला; तर पावसामुळे पश्चिमेकडे दरडी काेसळत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे. सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यानंतर मात्र, जोर कमी होत गेला. मात्र, सोमवारपासून पावसात वाढ झाली. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे परिसरातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच भातखाचरेही भरून गेली आहेत. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वाढत चालला आहे. मंगळवारी रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसाने पश्चिम भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत.
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी दरड कोसळली. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने युद्धपातळीवर मोहीम राबवून दरड हटविली. त्यानंतर वाहतूक सुरू झाली. तसेच कोकणला जोडणाऱ्या कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातही दरड कोसळली. तसेच महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरही दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला होता.सततच्या या पावसामुळे पाटण तालुक्याच्या मोरणा विभागात ओढे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. तसेच तालुक्यातील काही गावांचा संपर्कही तुटला आहे. शहरासह परिसरातही बुधवारी सकाळपासून संततधार कायम होती. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. जावळी, वाई तालुक्यांच्या पश्चिम भागातही जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.
... तर २० गावांचा संपर्क तुटणारपाटण तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोयना नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तालुक्यातील मूळगाव पुलाला पाणी लागलेले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूल पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे सुमारे २० गावांचा संपर्क तुटणार आहे.