सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर‘धार’ पाऊस सुरू असून २४ तासांत महाबळेश्वरला ५१, कोयनानगर ७३ तर नवजा येथे ११२ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना आणि नवजाच्या पावसाने यंदा दीड हजार मिलीमीटर पर्जन्यमानाचा टप्पाही पार केला आहे. तर कोयना धरणातही पाण्याची आवक सुरूच असल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ३०.८४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सातारा शहरात मात्र, पावसाची उघडीप होती.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस होत आहे. सुरूवातीला पूर्व तसेच पश्चिम भागात चांगले पर्जन्यमान झाले होते. मात्र, जून महिन्याच्या मध्यानंतर पश्चिमेकडे पावसाची उघडीप होती. त्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झालेले. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळ, कोयना, नवजासह महाबळेश्वरला पाऊस चांगलीच हजेरी लावत आहे. त्यातच कोयना, नवजा भागात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे.सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ११२ मिलीमीटर झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ६७० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. कोयना येथे आतापर्यंत १ हजार ५३८ मिलीमीटर पाऊस पडला. तर महाबळेशरलाही एकूण १ हजार २९९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. या पावसामुळे कोयना धरणात सकाळच्या सुमारास १८ हजार १२५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात ३०.८४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण २९.३० इतके झाले आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजूनही ७५ टीएमसी पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरण भरु शकते.
कोयनेत १० टीएमसी पाणीसाठा अधिक..जिल्ह्यात यावर्षी पाऊस वेळेत सुरू झाला. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत चांगले पर्जन्यमान झाले आहे. मागीलवर्षी ८ जुलैपर्यंत कोयनेला एकूण ८१९, नवजा येथे १ हजार १७७ आणि महाबळेश्वरला १ हजार २९९ मिलीमीटर पाऊस झालेला. तर कोयना धरणात १९.९४ टीएमसीची पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत यंदा कोयना धरणात १० टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. तरीही हे धरण भरण्यास आॅगस्ट महिना उजाडण्याचा अंदाज आहे.