सातारा : सातारा शहर व परिसरात दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळच्यासुमारास जोरदार पाऊस झाला. यावेळी वारेही वाहत होते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. रविवारी तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तसेच वीज पडून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवस पाऊस नव्हता. बहुतांशीवेळा ढगाळ वातावरण तयार होत होते.
दरम्यान, बुधवारी दुपारपासून सातारा शहर व परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर आकाशात ढग दिसू लागले. सायंकाळी पावणेसातच्यासुमारास वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काळे ढग जमा होऊन पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला मोठ मोठे थेंब पडू लागले. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. आकाशात ढग जमा झाल्याने अंधारून आले होते. सायंकाळी साडेसातपर्यंत रिमझिम स्वरूपात पाऊस पडत होता. तसेच ढगांचा गडगडाटही सुरू होता.
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सातारा शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना निवारा शोधावा लागला. तर घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.