सातारा, दि. 15 - सातारा जिल्ह्यात कोकणातील महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होता-होता थोडक्यात टळली आहे. गुरुवारपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे फलटण-बारामती मार्गावरील 60 फूट लांब सोमंथळी पूल वाहून गेला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पूल कोसळल्याची घटना स्थानिक लोकांच्या वेळीच लक्षात आल्यानंतर पुलावरुन जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. दरम्यान, हा पूल वाहून गेल्यानंतर राजाळे पुलावरुन जाण्याचा प्रयत्न करणारे दोन बाईकस्वार वाहून गेल्याची माहिती समोर आहे. दरम्यान, साता-यासह दक्षिण महाराष्ट्रात शुक्रवारदेखील (15 सप्टेंबर) जोरदार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
फलटण तालुक्यात मुसळ'धार' तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे फलटण तालुक्यातील बंधारेदेखील ओसंडून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे फलटण तालुक्यात अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. शेतांमध्ये जागोजागी पाणी साचलं आहे. शिवाय, जोरदार वा-यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर शेकडो झाडे उन्मळून पडल्यानं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. फलटण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने नागरिकांचं आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल विभागाने केलेल्या पंचनामान्यात 13 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती महसूल विभागाचे अधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.