सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढतच असून, मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १०७, महाबळेश्वर १२१, तर नवजाला १३९ मिलिमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर या पावसामुळे प्रमुख धरणांतील साठा वाढला आहे. कोयना धरण काठोकाठ भरले असून, ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर मंगळवारी सकाळीही धरणाचे दरवाजे सव्वापाच फुटांवर स्थिर होते.
जिल्ह्यात मागील १० दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते; पण हा पाऊस पूर्व, तसेच पश्चिम भागात सुरू असल्याने पिकांना फायदा झाला, तसेच तलाव, धरणांत पाणीसाठा वाढला. त्यातच गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढतच चालला आहे. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा वेगाने वाढला. कोयना धरण काठोकाठ भरले आहे. यामुळे रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा होता. धरणाचे सर्व सहा दरवाजे सव्वापाच फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. त्यामधून ४७८२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, तसेच पायथा वीजगृहातूनही २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना धरणातून ४९९२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे कोयना नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पूर्व भागात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. तरीही पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा येथे पावसाचा जोर वाढला आहे. जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४१५४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. नवजा येथे ५४६० आणि महाबळेश्वरला ५५०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
...
चौकट :
कोयनेतून विसर्ग वाढणार...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यातच १०५.२५ टीएमसी क्षमता कोयना धरणाची आहे. या धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढला आणि धरणात पाण्याची आवक अधिक होऊ लागल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४९९२७ क्युसेक पाण्याची आवक होत होती, तर तेवढ्याच पाण्याचा विसर्ग धरणातून होत होता.
...................................................................