सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला सर्वाधिक ९२ मिलीमीटरची नोंद झाली. तर धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातील पाणीसाठा १२.७६ टीएमसी झाला होता. त्याचबरोबर धरणात ९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला. तरीही मागील सात दिवसांपासून पूर्व भाग वगळता पश्चिमेकडे सर्वदूर पाऊस पडत आहे. मागील चार दिवसांपासून तर संततधार सुरू आहे. यामुळे कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी आणि कोयना खोऱ्यातील नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. या पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजाला ९२ आणि महाबळेश्वर येथे ८५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयनेला ४६३ आणि नवजाला ६३१ मिलीमीटर पाऊस झाला. तर सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ८०८ मिलीमीटर पडला आहे.पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी, कोयना धरण क्षेत्रात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरूच आहे. त्यातच कोयनाक्षेत्रात पाऊस अधिक होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सात दिवसांत जवळपास अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला. तर धरणात शनिवारी सकाळच्या सुमारास ९ हजार १२९ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता.जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असलातरी पूर्व भागात प्रतीक्षा कायम आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. त्याचबरोबर पाणीटंचाईचे सावटही अनेक गावांवर आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास खरीपाची पेरणी होऊ शकते. नाहीतर शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
साताऱ्यात सकाळपासूनच पाऊस...सातारा शहरातही मागील सात दिवसांपासून पाऊस पडत आहे. शनिवारीही सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना अडचणींचा सामना करावा लागला. तर सकाळी ११ नंतर ढगाळ वातावरण तयार झालेले. त्यानंतर दिवसभरात अनेकवेळा पाऊस पडला.