सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असून गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ३३१ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण पाणीसाठ्यात सवा सहा टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणात ३७.३६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.जिल्ह्यात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. त्याचबरोबर जोर पकडण्यासही उशिर लागला. त्यातच मागील चार दिवसांपासून पश्चिम भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली भागात धुवाॅधार सुरू आहे. यामुळे पश्चिम भाग चिंब झाला आहे. लोकांनाही घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. तर या पावसाने घाटमार्ग तसेच दुर्गम भागात दरडी कोसळणे, झाडे पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे जनजीवनावर परिणाम झालेला आहे. शनिवारपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. गुरुवारीही पावसाचा जोर दिसून आला.गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ३३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यानंतर नवजा येथे २७२ आणि कोयनेला २५३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम भागात संततधार कायम असल्याने कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी सारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होताना दिसून येत आहे. विशेष करुन कोयनेतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.सकाळच्या सुमारास धरणात ७४ हजार ५६९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊन ३७.३६ टीएमसी झाला होता. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात सवा सहा टीएमसीने साठा वाढला. त्यामुळे यंदा उशिरा का असेना कोयना धरणातील साठा ४० अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
नवजा, महाबळेश्वरचा पाऊस दोन हजारी...पावसाळा सुरू होऊन दीड महिना होऊन गेला आहे. त्यातच जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस दाखल झाला. मागील चार दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस जोर धरत आहे. एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा नवजा येथे २२३६ मिलीमीटर पडला आहे. त्यानंतर महाबळेश्वरला २२२९ आणि कोयनानगर येथे १५६० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.