बामणोली : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरात नेहमीच जाेरदार पाऊस पडताे. या पावसामुळे अनेकवेळा घाट रस्त्यांवरील दरडी काेसळणे, घाट रस्ता बंद हाेणे अशा घटना घडत असतात. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर आणि प्रतापगड परिसरात झालेल्या पावसामुळे चतुरबेट येथील कच्चा पूल पाण्यात वाहून गेला आहे.यंदा म्हणावा तसा पाऊस अद्याप सातारा जिल्ह्यात पडलेला नाही. महाबळेश्वरात जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाची नाेंद ७२ मिली मीटर इतकी नोंदविली गेली आहे. महाबळेश्वरच्या लगतच्या भागातही जोरदार पाऊस झाला. दरम्यान गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील रस्ते पूल वाहून गेले होते. त्यानंतर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात रस्ते आणि पूल दुरुस्त केले हाेते. दरम्यान यंदा मात्र पहिल्याच पावसात या भागातील पूल आणि रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आगामी काळात अतिवृष्टी झाली तर खूप मोठ्या प्रमाणात या भागातील रस्त्याचे आणि पुलांचे नुकसान होऊ शकते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यंदा महाबळेश्वर आणि प्रतापगड भागात पडत असलेल्या पहिल्याच पावसात चतुरबेट पूल पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची दळणवळणाची अडचण झाली आहे. काही भाग हा दुर्गम असल्याने ग्रामस्थांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग शाेधावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्ते आणि पूल दुरुस्त करावेत अशी मागणी हाेत आहे.
चतुर बेटच्या पुलाचे अजून बांधकाम चालू आहे. पूल बांधताना मातीचा कच्चे डायव्हेशन केले होते. ते तात्पुरत्या स्वरूपात केले होते. दोन तीन दिवसा पूर्वी तापोळा परिसरात पाऊस जास्त झाला. नदी ओढ्याला पाणी आले. त्यामुळे ते डायव्हेशन वाहून गेले आहे. मूळ पूल अजून तयार व्हायचा आहे. - महेश गोंजारी, उपविभागीय अधिकारी, महाबळेश्वर