- अजित जाधव
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू आहे. येथील प्रसिद्ध वेण्णालेक तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव परिसर हा धुक्यात हरवला असून, या संततधार पावसाने महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नरनजीक पाणी आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ मंदावली. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. बुधवारी देखील दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. मात्र, शहरात कोणत्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही. मात्र पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते.
वेण्णा नदीच्या ओसंडून वाहत आल्याने लिंगमळा परिसर जलमय झाला होता. शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाहावयास मिळाले. मंगळवारी रात्रभर धुवाँधार पाऊस कोसळत होता. जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून महाबळेश्वरला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी दिवसभर धुवाँधार पाऊस सुरु होता. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १४८ मिलिमीटर ( ६ इंच) पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड गावाजवळ २२ केव्हीची विद्युत लाईनवर पडलेल्या झाडाच्या फांद्या एमएससीबी हटवून विद्युत पुरवठा सुरळीत केला. जावली पुलाजवळ चोकअप झालेली मोरी गावातील तलाठी व कोतवाल यांनी स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत केला तर जावळी कोयना नदीशेजारी खचलेला रस्त्याची जिल्हा परिषदेच्यावतीने तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त करण्यात आला. शिंदोळा येथे दोन दिवसांपूर्वी दरड काढलेल्या ठिकाणीच पुन्हा कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेएसीबीच्या साह्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत सुरू करण्यात आला. पार येथील शिवकालीन पुलासमोर लाकडे व कचरा जमा झाला होता. त्या ठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने साफसफाई कारण्यात आली.
जेसीबीच्या साह्याने रस्ता सुरळीत...घराची भिंत पडली
तालुक्यातील बिरवाडी, चतुरबेट, दाभेमोहन घावरी-येरणे रस्त्यावर काही प्रमाणात कोसळलेले दरड बांधकाम विभागाच्यावतीने जेसीबीच्या साह्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. चतुरबेट ते दुधगाव भागातील बंधारा, पूल व नदीचा पाण्याचा प्रवाह येथे मोठ्या प्रमाणावर जमा झालेली लाकडे बांधकाम विभाग व चतुरबेट व दुधगाव गावातील ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला, अशी माहिती बांधकाम विभागाचे महेश गोंजारी यांनी दिली.मुसळधार पावसामुळे महाबळेश्वच्या मुख्य बाजारपेठेतील महाबळी यांच्या घराची भिंत कोसळली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे, मात्र नुकसान झाले.