सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरूनराजाने मंगळवारी दुपारी सातारा शहर व परिसराला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले तर विक्रेते व खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
सातारा शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी बारानंतर पावसाचा एक- दोन सरी बरसल्या. यानंतर पावसाने उघडीत दिली. मात्र, दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली.
विजेचा कडकडाट व वेगवान वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. गणेश मंडळाकडून उभारण्यात आलेले भव्य-दिव्य देखावे देखील या पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे.