सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपासून पाऊस सुरू असून सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत असून २२ टीएमसी इतका झाला आहे. त्याचबरोबर पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला पूर्व दुष्काळी भागातही पाऊस पडू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण, हा आनंद आैटघटकेचा ठरला. कारण, अजूनही दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. तर पश्चिम भागात १५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसाचा जोर कमी-अधिक होत असला तरी खरीप हंगामाच्यादृष्टीने उपयुक्त ठरत आहे. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कांदाटी खोऱ्यात चांगला पाऊस झालेला आहे. यामुळे भात लागणीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. तसेच पेरणीसाठी पावसाची उघडीप आवश्यक आहे.पश्चिम भागात शुक्रवारच्या तुलनेत शनिवार, रविवारी पाऊस कमी पडला. तर सोमवारी सकाळपासून उघडझाप सुरू होती. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला २८ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २० आणि महाबळेश्वरला २७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. एक जूनपासूनचा विचार करता महाबळेश्वर येथे सर्वाधिक १३५२ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्यानंतर नवजा येथे १२४० आणि कोयनानगरला ८७४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.यावर्षी कोयनेला पाऊस कमीच झालेला आहे. दरम्यान, सकाळच्या सुमारास कोयना धरणात २२.१२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात १२,८६८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. मागील काही दिवसांपासून धरणातून होणारा विसर्ग बंदच करण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर; कोयना धरणातील पाणीसाठा वाढू लागला
By नितीन काळेल | Published: July 10, 2023 1:06 PM