महाबळेश्वर : समुद्रात आलेल्या ‘तौउते’ चक्रीवादळाचा महाबळेश्वर तालुक्याला फटका बसला आहे. दोन दिवस वादळी वारे व मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. चक्रीवादळामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले.
तालुक्यातील झाडे उन्मळून पडणे, घराचे छप्पर उडणे, अंगणवाडी शाळांच्या इमारतींचे नुकसान, पाणीपुरवठा बंद पडणे, वीज गायब होणे, नदी-नाल्यांना अचानक पूर येणे, गुरांचे गोठे, पाॅलिहाऊस, संरक्षक भिंती पडणे अशा घटनांच्या मालिकांमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच ठिकाणी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुणीकडेही जीवित हानी झाली नाही.
घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तालुक्यातील किल्ले प्रतापगड, राजपुरी, भेकवली, चिखली, देवळीमुरा, कोंढोशी येथे घरांचे छप्पर उडाले, भिंती कोसळल्या. चिखली गावातील अंगणवाडी शाळेची इमारत कोसळली, कासरूड येथील प्राथमिक शाळेचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात विजेचे खांब व विद्युत तारा पडल्यामुळे शनिवार, रविवार, सोमवार संपूर्ण तालुका अंधारात बुडाला आहे. शनिवारपासून वीज पुरवठा बंद आहे. खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण विभागाचे कर्मचारी तारेवरची कसरत करीत आहेत. तरीही सोमवारी रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
शनिवारपासून वीज गायब झाल्यामुळे त्याचा परिणाम महाबळेश्वर, पाचगणीसह तालुक्यातील विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांवर झाला आहे. अनेक गावांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. वीज येईपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. महाबळेश्वर पालिकेने टँकर भरून ठेवले असून, मागणी केल्यास पुरविण्यासाठी तयारी करून ठेवली आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे नदी-नाले ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोमवार दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी वादळी वारे काही कमी झाले नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वेण्णालेकच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. लिंगमळा धबधब्यावरूनही कोसळणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. मे महिन्यात लिंगमळा धबधब्यावरून कोसळणाऱ्या जलप्रपाताचे दृश्य मोठे विलोभनीय दिसत आहे.
फोटो १७ महाबळेश्वर-रेन
महाबळेश्वर तालुक्यात शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. (छाया : अजित जाधव).