रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरून ओढ्याच्या पाण्यासारखे पाण्याचे लोट वाहत असून, आडसाली ऊस भुईसपाट झाले आहेत. दुर्गळवाडी येथील विहीर ढासळली आहे.
रहिमतपूर परिसरातील गावात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचे तांडव सुरू आहे. जोरदार व संततधार पावसामुळे शेतात पाणी तुडुंब भरल्याने सोयाबीन पीक नासून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रहिमतपूर-सातारा या रस्त्यावर अर्धवट काम झालेल्या तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणच्या रस्त्यावरून सतत पाण्याचे लोट वाहत असल्यानेच रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी नाले न काढल्यामुळे आजूबाजूच्या शेतात तुडुंब भरलेले आहे. पावसाबरोबरच अधूनमधून वाऱ्याची झुळूक येत असल्याने वाढलेले आडसाली ऊस भुईसपाट झाले आहेत. शेतातील कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, जनावरांना शेतातून चारा आणणे दुरापास्त झाले आहे.
जोरदार पावसामुळे पिकावर विपरीत परिणाम होईल, या चिंतेने आले उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. उभ्या पावसातच छत्री घेऊन अनेक शेतकरी आल्याच्या फडातून पाणी बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. सततच्या पावसामुळे दगडात बांधण्यात आलेली दुर्गळवाडी येथील पंढरीनाथ दादू यादव यांचे रिकिबदारवाडी येथील जमीन गट नंबर २३२ मध्ये असणारी विहीर पडून सुमारे एक लाख दहा हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती रहिमतपूरचे मंडलाधिकारी विनोद सावंत यांनी दिली.
* (१)फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील पावसामुळे ऊस भुईसपाट झाला आहे.(छाया : जयदीप जाधव)
(२) रहिमतपूर - सातारा रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत असल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. (छाया : जयदीप जाधव)