मलकापूर-
मलकापूरसह परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडाकडाटात दमदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांसह आडसाली ऊस पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीयोग्य असलेले उन्हाळी भुईमुगाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपासूनच उकाड्यात वाढ व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासूनच आकाशात ढग जमा होण्यास सुरवात झाली. दुपारनंतर सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सगळीकडे ढग दाटून आल्याने दिवस मावळल्यासारखे वातावरण झाले होते. अचानक विजांच्या कडकडाटास सुरुवात झाली. काही क्षणातच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे दोन तास पडलेल्या पावसामुळे मलकापुरातील कराड-ढेबेवाडी रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूचे उपमार्ग जलमय झाले होते. उकाड्यापासून थोडा गारवा मिळाला. मात्र, बुधवारी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे . सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय पिकेही घेतली जातात. भेंडी, गवारी, घेवडा यासारख्या शेंगवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही सध्या या परिसरात वाढली आहे. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे. तर जोराच्या वाऱ्याने वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी आडसाली ऊस पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. अचानक आलेल्या दमदार पावसामुळे सध्या काढणीयोग्य असलेले भुईमुगाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चौकट
फूलशेतीचे नुकसान
अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे सर्वांची चांगलीच धावपळ झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी फूलशेती केली आहे. फुलांच्या शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.